1 : लोभस : लोभी अर्थात लोणावळा ते भिमाशंकर
लोभस..लो-भी
भाग १ ला ..प्रकाशन 1 आक्टोंबर : शुक्रवार
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬
नमस्कार मंडळी..
कसे आहात..?
ट्रेक करता ना..?
ट्रेक केलेचं पाहिजे..🤷
नाही तर फिट कसे रहाणार..💪
तर..निघा 🚶🚶🚶🚶
☘️
" तीन ऋतुतले सहा सुख-सोहळे अनुभवायचे असतील तर,
सह्याद्री सारखी दूसरी जागा नाही.
ऋतुबदलांची बदलणारी कुस आणि
आपसूक सह्याद्रीचा बदलत जाणारा रंगमंच,
जो याची डोळी अनुभवतो..
तो सह्याद्रीच्या अपार प्रेमात पडतो.
☘️
त्याचा निसर्गाकडे आणि जिवनाकडेही
बघण्याचा दृष्टिकोन बदलतो.
आणि जगण्याचा भावार्थही.
त्यांच बघणं,त्याचे विचार,त्याचं वागणं,
त्याचा दृष्टिकोन, आणि त्याचं व्यक्तिमत्त्व..
सारं काही वाईड अँगलमध्ये रूपांतरित होतं जातं.
आणि..
कालांतराने आनंदाची..सुख समृद्धीची
व्याख्याचं कुस बदलत जाते.
☘️
निसर्ग आणि सह्याद्री यांचा
स्वर्ग-निर्मितीचा अनोखा मिलाप
जगण्याचे रंगही बदलत जातो.
म्हणून..
निसर्ग हिचं देवता आहे.
आणि "सह्याद्री" हे त्याचं
प्रतीरूप 🙏☘️
★★★★★★★★★★★★★
प्रत्येक ऋतूत ट्रेक करण्याची एक
वेगळीचं नशा असते.
पण पावसाळ्यात ती अधिकचं
धुंद करणारी उठावदार ठरते.
पाऊसात अंग अंग मोहरून
घेण्याचं गमक उमगलं की
भटक्या स्वतःचा रहात नाही.
●या ऋतूत ट्रेकिंगसाठी अश्या काही खास
जागा आहेत.ज्या पुन्हा पुन्हा कराव्याश्या
वाटतात.त्यातली एक म्हणजे लोभी..!
अर्थात लोणावळा ते भिमाशंकर.
●नाशिक-पुणे सह्यमित्र मंडळात ठराव पास झाला
या विक एण्डला लोभी करूयात.
आणि फायनल नियोजन ठरलं.
ते पुढिलप्रमाणे 🚶🚶🚶🚶🚶
●" लोणावळा-तुंगार्ली-वळवंड-कोंडेश्वर-जांभिवली (मुक्काम)-कुसूर-( कुसूर ते तळपेवाडी गाडी प्रवास)तळपेवाडी-
वांद्रे खिंड-पढरवाडी (मुक्काम)-कमळजाई मंदिर-भिमाशंकर "
●हाच रूट आम्ही पाच एक वर्षापूर्वी केलेला.
पुन्हा तो आकर्षणाचा विषय ठरला.
नी..निघालो 🚶
🎬
भल्या सकाळी (८:१० वाजता) लोणावळ्याला पोहचलो.
पहाटेची 3 ची झूकझुक गाडी पकडली ती कल्याण पर्यंत.
मग तिथून " इंद्रायणी काठी..देवाची आळंदी ..
भिमसेन ऐकत..लोणावळा गाठलं.
पुणेकर त्याचं वेळी स्टेशनवर भेटले.💃
आणि फुल टू कल्ला झाला मग 😀
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🎬 अन्नपूर्णा हाँटेलमध्ये चवदार नाश्ता हाणला.
आणि ९ आसपास राजमाची हायवेने सुटलो.
खरं लोणावळा पर्यटकांच आणि भटक्यांच मर्मस्थळ.
त्यांत महत्त्वाचं म्हणजे लोणावळा चिकी.
पण खरं सांगू का ?
आम्ही त्या दुकानांकडे ढुंकूनही बघितलं नाही.
आणि कुतुहूलाच्या नजरा इकडेतिकडे भरकटल्याही नाही.
आम्हा भटक्यांच एकचं लक्ष..
फक्त सह्याद्री ⛰️
★ तसा काळसर डांबरी रस्ता कुठल्याही ट्रेकरला नकोसा वाटणारा.
तरी जवळपास 5/6 किमीतरी उत्साहभरली पण बोर चाल करत तो पार केला.
मात्र पुढची चालही ऐसपैस अगदी टू लेनवाली.
दुतर्फा हिरवाई सोबतीला.गाडी रस्ता असल्याने काही पर्यटक
वर्दळ होती जरा.पण आम्ही आमच्याच मस्तीत.डावीकडे धबधब्याजवळ मौज व फोटोग्राफी आनंद घेत निघालो.टपरीवजा हाँटेलमध्ये चहा घेतला. नी निघालो..
पुणेकरांचा विकपाईंट राजमाची दृष्टीक्षेपात.
मोहक आणि रूबाबदार.
" राजमाची आणि माचीवरचा बुधा आठवला.गोनीदांनी शब्दबद्ध केलेला.सज्जनगडावर झालेल्या दुर्गसाहित्य संमेलन वेळी वीणाताई, विजय देव व रूचीर कुलकर्णी यांनी माचीवरचा बुधा वाचनाद्वारे असा काही वठवला होता की अंगावर शहारे आणि डोळ्यात पाणी उभं राहिले होते.स्थानिक भाषेतले संवाद अगदी जिवंत वाटावेत असे.कमाल..🙏
सोबतीला मनरंजन नी श्रीवर्धन.उधेवाडी हिरवाईत लपलेली जणू.सगळा सळसळता हिरवा भोवताल.खोल दाट हिरवाई मोहक.आजूबाजूचा सारा आसमंत हिरव्या रंगाच्या शेकडो छटांनी नटलेला.सर्वत्र कळशीतून आणून ओतल्यासारखा हिरवाकंच रंग.
सुबक घरांच वळवंड गाठलं नी देवळाच्या ओहोळाने जात दाट सदाहरित वनराईत घुसलो.काही काळ जणू जंगल वाँक.धुक्याने धुंद करणारा माहोल तयार केलेला.कधी पाऊस कोसळेल असं वातावरण.समोर दक्षिणोत्तर पसरलेला डोंगर ओलांडून पलीकडे कोंडेश्वर मंदिर गाठायचं होतं.मग दोन किमी वरील जांभिवली.
डोंगरचढाई सुरू झाली नी पाऊसाने आपले रंग दाखवायला सुरुवात केली.चढाईची वळणदार जंगलवाट.थोरली झाडे ताठमानेने उभी. जसे वर चढत होतो तसा पाऊसाने जोर वाढवला.वाटेत काही ढोरवाटा दोन तीन दिशांना सुटलेल्या.आणि एका वळणावर मागची टिम वाट चुकली.पुढे जाऊन आम्ही त्यांची वाट बघतोय.ओरडून झालं..शिट्या मारून झाल्या.पण प्रतिसाद नाही.
☘️
शेवटी तुषार,मग विजय त्यांचा मागोवा घेण्यासाठी मागे फिरले.विस एक मिनिटे झाली.तेही गायब.लक्षात आलं की मागचे भिडू वाट चुकले वाटतं.काही वेळानंतर अमीत निघाला.इकडे तुफान पाऊस कोसळतोय.झाडातनं अजून दणक्यात पडतोय.भल्या प्रचंड डोंगरपर्वतांनी टाकलेले पावसाळी रानगंधाचे श्वास आसपासच्या द-या-घळीतनं तळातून वर येत भारून टाकत होते. निद्राधीन झालेल्या ओलसर झाडांतून पाऊस जणू झिरपत होता.काळसर अस्पष्ट आकारातून काजळगाण घुमत होतं.मोठा चित्तथरारक अनुभव होता तो चिंबभिजवणारा.
☘️
बरं तिथे ना बसायला जागा ना नीट उभं राहायला.
अमित परतला "ओ भी खाली हात 😀
मग काही वेळानंतर विजय,तुषार भरकटलेल्या भिडूंसह परतले.हायस वाटलं.एवढ्या दाट जंगलात शोधन महामुष्कील काम.
★ पण सुदैवाने " शोध" यशस्वी झाला.
मुरलीधर खैरनार आठवले राव.
"शोध"हि ऐतिहासिक पण कल्पीत कांदबरी काय तुफान लिहिली आहे त्यांनी.गुंतागुंतीची नी चक्रावून टाकणारी.
असो..ते एक वेगळं प्रकरण आहे 🙏
☘️
जांभिवली पठार गाठल..कारवीचं साम्राज्य सुरू झालेलं.वाटेत अनेक ठिकाणी नुसता खळखळाट.डावीकडे दरीचा भाग कधी उघडला जायचा.धमाल व्हू अचंबित करत असायचा.पाऊसानं कोसळण थांबवून रिमझिम सुरू केलं.सर्वांगाला सुखाचा मोहर फुटत होता.भोवतालचं सारं चित्र वावर चित्रातल्या सारखा स्तब्ध.सगळ्यांच्यांच वृत्ती निसर्गसानिध्यात गुंगावल्यासारख्या झालेल्या.टप्पे टप्पे ओलांडत एकदाचं कोंडेश्वर मंदिर कळस दिसला नी आनंदाला उधाण आलं.डावीकडे कोकणदरी नी मांजरसुंब्याचा पहाडी नजराणा कमाल दिसत होता.धारेवर पोसलेली भलेजंगी निवडुंग, वारस,शिंदी,उंबर,जांभूळ झाडांची हजेरी सुखावणारी.उजवीकडे पावसाळी धबधब्यांची कोरीव घळ उत्तेजित करणारी.
☘️
सुसाट उतराई करत मंदिरात पोहचलो.भग्नमंदिराचं पुनर्जीवन केलेलं.नितांत सुंदर जागा.पाठीमागे रांजणखळग्यांचा समूह.आणि पाठिमागे राजस हिरवाईने डोंगर सजलेला.टिप टिप पाऊस सुरूचं.इकडे तर मंदिर दरवाजा बंद.लाँकडाँउन इफेक्ट. तिथेचं शेडमध्ये थोडी पोटपूजा केली.दिवस मावळतीकडे झुकलेला.
जांभिवली दोन किमी.चाल सुरू झाली.टार रस्ता.जागृत कोंडेश्वर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोय.
☘️
आणि एकदाचे जांभिवलीत पोहचलो.तेही अंधार पाश टाकण्याआधी.पाच वर्षापूर्वी इथेचं मुक्काम केलेला.आजही तिथेचं.ओले कपडे बदलले.चहा घेऊन सर्व ताजेतवाने झालो..मग हाँलमध्ये गप्पां गाण्याचा फड रंगला.तेलमाँलीश सुरू झाली.खोबरेल तेलमुळे पाऊसाळी आंबलेलं शरीर फ्रेश झालं.चेहरे उजळले.दिवसभरातल्या दमदार चालीने सगळ्यांच्या मनातल्या भावना ओलावून पाझरल्या.
गरमागरम जेवण आलं.पोटभर जेवलो.डेझर्ट गुलाबजाम हाणले.नी पुन्हा सह्य आठवणीत रमले.उत्तरोत्तर निद्रापाश जड झाला.
☘️
भाग पहिला समाप्त ..
वाचाल तर प्रतिक्रिया द्या.😀
तेवढाच तो काय आनंद 🙏
भेटू भाग दोन मध्ये..🎬
तोपर्यंत भिजू पाऊसांत ⛈️
धन्यवाद
आपलाचं 🚩
संजय अमृतकर
Gypsy trekkers
Nashik
हक्क राखीव ©
भाग दूसरा..लिंक 👇
http://sanjayamrutakar.blogspot.com/2021/10/2.html
व्वा, नाना.. अगदीच छान! कमालीचं लेखन केलंत. फोटोही खूप छान. जांभिवलीपर्यंतचा पहिलाच भाग प्रकाशित केलात पण मन मात्र भीमाशंकरपर्यंत पळवलंत.. 🤣🤣
ReplyDeleteसंपुर्ण भटकंतीमार्ग डोळ्यांसमोर अजूनही तरळतो आहे.
एकदम 'भुंगा' झालाय ब्लॉग! पुढील भागांच्या प्रतीक्षेत...
😍👍
जोरदार ब्लॉग, दर्जेदार वाटा, अफलातून निसर्ग
ReplyDeleteआहा
!!!! कमाल लिखाण