भोरांड्याच्या ओठात आणि नाणेघाटाच्या पोटात..

" भोरांड्याच्या ओठात नाणेघाटाच्या पोटात "
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
16/09/2021
नमस्कार मंडळी,
गणपती उत्सवात सर्व मंडळी व्यस्त व आनंदी असाल.
त्यांत वरूणराजाने अपारकृपा केल्याने सर्वत्र उत्साहाचं
वातावरण आहे.हि बाप्पा कृपा 🙏
तर फार मोठ्या कालांतराने ब्लॉग लिहायला घेतला.
लिहणं होतं तेव्हा वाचनही होतं आपोआप.मध्यंतरी सर्वचं बंद होतं.आता पुन्हा पाढे पच्चावन्न.👍😀
लिहित राहू..भटकत राहू आणि भेटत राहू..🙏
ब्लॉग वाचा...प्रतिक्रिया द्या ❤️
🎬
" ऐन पावसाळ्यात 'बकेट' लिस्टमध्ये अनेक ट्रेक्स उतू जाण्याच्या बेतात होते.पण कुठे अती पाऊस,कुठे रस्ता अतीखराब,कुठे लांबचा प्रवास. इ. कारणांनी अनेक बेत ठरवूनही रद्द करावे लागत होते.पण भोरांड्यादारचं भूत जणू मानगुटीवर बसलं नी जाण्याचा बेत पक्का झाला.खरं तर एकदाचं घोडं गंगेत न्हालं..!
तसा हाही ट्रेक चक्क तीन वेळा पुढे ढकलला गेला होता.
असो.
सह्याद्रीत कुतुहल असणाऱ्या अनेक वाटा अजूनही वेटींगला आहेत.सातत्याने भटकत असूनही समाधानकारक भटकंती झाली नाही असं वाटतं रहातं.हिचं तर खरी सह्याद्रीची मोहमाया आहे. अनेकांना नात्यांची,पैश्याची माया सुटलेली असते मला तर सह्याद्रीमायेने पुरत गुरफटून टाकलं आहे.आता सुटका नाही याची जाणीव कधीच झाली आहे.पुढील सारं आयुष्य सह्याद्री मायेत घालवं ..हा नियती संदेश आयुष्याचा सारीपाट बदलू पहातोय.
☘️
तर ..भोरांड्याचं आवतन स्विकारल नी बांधाबांध चालू झाली. अनपेक्षित भिडू गोळा झाले.नाशिक-पुणे सह्यमित्र मंडळ आयोजनाचा भार उचलणार होते.भोरांड्याच्या दारात काय लिहून ठेवलंय याची पुसटशी कल्पना त्यांना काय मलाही माहित नव्हती.काही वेळेसाठी का असेना पण निसर्गाचं अचाट व अफाट रूप अनं क्षणोक्षणी बदलणारं वातावरणाचं रूपडं अचंबित ठरणार होतं तिथे.
" आणि ट्रेकसाठी उद्या निघायचं तर शनिवारी सोशल मिडियावर हेवीरेन फाँलचा अलर्ट आला.मनात चलबिचल सुरू झाली.गाडी ठरलेली.सर्वांची तयारी झालेली.इतर नियोजनही फुल फायनल झालेलं.पुढे ढकलला..हे दोन शब्द आता नकोसे होते.पुणेकरांत कोणीतरी नाठाळ दिसतोय.अस मला वाटू लागलं.😀नाशिककरांत तसा कोणी नसावा.कारण नाठाळपणा तर गोदाकाठावर धुऊन काढलाय आम्ही.
😀
नाणेघाट परिसर म्हणजे सदासर्वदा पाऊसाचं माहेरघर.त्यात नाशिकलाही जोरकस पाऊस सुरू असलेला.त्यामुळे अलर्ट बाबत शक्यता अधिक बळकावली होती.
पुणेकरांशी बोलणं झालं.विजय/तुषार अजून चौकशी फे-यात.आणि सदाशिव पेठेतनं मेसेज आला.जायचं म्हणजे जायचं. आणि निघायचं पक्कं झालं.
कुठल्याही वातावरणात आणि परिस्थितीत ट्रेकचं नियोजन कधी बदलू नये.हि शिरस्ता अनेक वेळा घडलेला.अपरिहार्य कारणे त्याला अपवाद.पण आता उद्या जाणं पक्क झालं नी हायसं वाटलं.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
" भल्या पहाटेला निघालो.ठिक ५:२० वाजता.२६ सिटर बसने वेग घेतला.सोबत 23 भिडू.काही अनुभवी काही बाळसं धरलेले.गेल्या सहा-सात वर्षात नवीन शिक्षित ट्रेकर्स तयार करायचा वसा घेतलेला आहे. अनेक अडचणींवर मात करत तो आजही सुरू आहे. आनंद वाटून घेण्याचं एक वेगळं समाधान असतं.आत्मिक समाधान.सुदैवाने
ट्रेकिंगच्या एकुणचं प्रवासात सोन्यासारखी माणसं मिळत गेली..भेटत गेली.त्यामुळे सुखद अनुभवांची नुसती रेलचेल आहे.

☘️ गाडी सुरू होताचं "गणपती बाप्पा मोरया"चा गजर झाला.वातावणाचा नूर बदलला.सात्विकतेचा दरवळ सुरू झाला. मग आपसात गप्पांचा फड रंगला.
बाहेर कुंद वातावरण.काही वेळात सर्व पेंगू लागले.वातावरण निरव होऊ लागलं.तिकडे शहापूर येईपर्यंत आकाश फटफटलं.आणि झुंजमुंजू काळात सरळगांवकडे गाडीने वळण घेतले.किन्हवली ओलांडले नी सरळगावांत पोहचलो.चौफुलीवर चांगली 4 डझन केळी घेतली.नाश्त्यासाठी थेपले घेतलेचं होते.त्यामुळे कुठे थांबायला नको.सकाळचं नियोजन काटेकोर हवं.संध्याकाळचं हाताबाहेर जातं म्हणून.😀

☘️रस्ता तर करकरीत.शहापूर पासून किरकोळ खराब.पण पुढे अगदी आश्चर्यकारक टार रस्ता.पावसाळ्यातही हे महत्त्वाचे. कमळूला फोन लावला.म्हणला' नाणेघाट उजवीकडे आणि डावीकडचा भोरांडे फाटा क्राँस करा.पुढे डावीकडे रेनबो हाँटेल दिसेल तिथं थांबा.आम्ही येतोचं आहोत.
काही वेळातचं रेनबोला टच करेपर्यंत उजेडाचं साम्राज्य सुरू झाले होते.दक्षिण पुर्वेला उतुंग मोरोशीचा भैरव सलामीला उभा.बघताचं अनेक आठवणींना उजाळा मिळू लागला.नांगरदारची खास आठवण झाली.तोचं पुणेकर कमळूसह आले.चहा नाश्ता झाला.ओळख झाली नी जयजयकार करत निघालो.

☘️रेनबो सोडून हायवेने काही अंतर चालून गेल्यानंतर डावीकडे एक पुसटशी वाट दाट हिरव्या वनात जाणारी.कमळूची पाऊलं तिकडे वळाली आणि मागे आमची.पहाट पाऊस हजेरी लावून गेल्याने ओलेपणा टिकून होता.हिरव्याकंच झाडीत आमची पाऊलं सराईतपणे चालत होती.सोबतीला खळखळणारे झरे आणि टिपटिप पडणारं पाणी.
टिप टिप बरसा पाणी... पाणीने आग लगाई..
रविना टंडन जंगलात कुठे नाचू लागली की काय ?
हे गाणं आठवलं.
आठवले म्हणून आठवलं...तसं

☘️तर मस्त चढाई.सिंगल लेन सारखी.मात्र वळणदार.सोबतींची संख्या जास्त असली तरी कुठेही खडखड नव्हती.जो तो सावध आणि शिस्तबद्ध.काही वेळानंतर रिमझिम सुरू झाली.ती अपेक्षित होतीचं.आणि खळखळाट बहरू लागला.पचक पचक आवाज जो हवाहवासा.तोही ताल धरू लागला.तासाभरात ब-यापैकी अंतर पार झालेलं.आणि एका ठिकाणी जरा सपाटीवर वाँटर ब्रेक आणि ग्रुपफोटो झाला.समोर एक नाळ तिरकस उतरणारी दिसली.तीचं वाट भोरांड्याच्या दाराकडे जाणारी.इती..कमळू.

☘️डोंगरमाथा ढगात लपलेला.विजेच्या तारा माथ्याकडे जणू झेपावलेल्या.मस्त हवा.धुंद वातावरण.पायथ्याकडे जणू हिरवाशालू पसरलेला आणि माथ्यावर शुभ्र ढगांच कोंदण.सर्व भिडू उत्साहाने ओसंडून वाहत होते.सर्व फिट अँड फाईन.
आता दाट जंगलातून डावीकडे तिरकस चाल वळणाची.हलकासा चढ-उतार.वाटेत चंदेरी निर्झर सुख देणारे.खळखळ आवाज कानात गुंजगोष्टी सांगणारा.हवाहवासा..ओढ लावणारा.
काही वेळात वाट डावीकडे वर नेऊ लागली.याचा अर्थ आम्ही भोरांड्याच्या नाळेत घुसलो होतो.आता जरा दमछाक होऊ लागली.चढाईचा वेग हलकासा मंदावलेला.पण प्रसन्नतेचा लवलेश जसाच्या तसा टिकून होता.दाट वनराई मुळे झापड बांधल्यासारखं चाललेलं.फक्त चढत रहायचं.कधी घसरण पण व्हायचं.त्याशिवाय मजा नाही.
त्यामुळे आसपासचा व्हू काही दिसेना.कधी कुठे मोकळेपणा यायचा.तेंव्हा आम्ही बरेच वर आल्याचं जाणवायचं.पुन्हा माथ्याकडे चढाई सुरू व्हायची.काही भिडू पुढे तर काही जरा मागे.पण सर्वांची चाल अगदी लयीत.त्यामुळे खुपसं टेंशन नव्हतं.
🎬
☘️ कारवीचं रान पार करत आम्ही एका मोकळ्या चढाई ठिकाणी पोहचलो नी 'भोरांड्याचा कोहिनूर'दृष्टीक्षेपात येऊ लागला.
भोरांड्याचे द्वारपाल जणू कवेत घेण्याच्या आविर्भात उभे.आणि वरून कोसळणारा खळखळाट बघून सा-यांची मती गुंग होऊ लागली.पुढे गेलेले विजय,तुषार,संदिप,विपिन आणि कमळू मस्त निवांत बसलेले.रिमझिम मध्ये चिंब भिजत.आमची वाट बघत.आम्ही तिथं पर्यंत पोहचे पर्यंत रिमझिम पाऊसाने जोर पकडला.आणि आनंदाला उधाण आलं.
☘️" समोर ७० एम एम नजारा खुल जा सीम सीम सारखा सताड उघडलेला.बाहू पसरून भोरांडा अलिंगन देण्यास आतुर झालेला होता.आसमंतात घनघन मालाची श्रीमंती उतू जात होती.आम्ही भान हरपून बसलो होतो.

आज फिर जिनेकी तमन्ना है..
तिकडे लता गात होती..
इकडे डोळ्यातून लाखमोलाचे अश्रू घरंगळू लागले.
यस..!!!
याचंसाठी अट्टाहास होता.
स्वप्ने पाहिली होती..
रात्र रात्र जागलो होतो..
तळमळलो होतो.

ते आज समोर ओंजळीतनं बरसत होतं.
निसर्गाने दान टाकलं होतं.
७० एम एमचा पडदा बाजूला सरकला होता.
आणि भोरांड्याचं सोनेरी वैभव लखलखू लागलं होतं.
जणू काळ थांबला होता आणि श्वासही.

सह्याद्रीने अद्भुत दान टाकलं होतं.
दुतर्फा उभे कातळकडे शुभ्र धारांचा वर्षीव करत होते जणू.
आणि समोर खचाखच शिळांनी भरलेली नाळ शुभ्र निर्झरांनी ओसंडून वहात होती.
आकाशदेवतेच्या आदेशाचं पालन करत वर्षाराणी हळूवार बरसू लागली.स्वप्नवत वाटावं असा सारा बहुरूपी नजारा याची डोळी आम्ही अनुभवत होतो.जसे आम्ही वर हळूहळू पाऊलं टाकत होतो.तशी रिमझिमने कुस बदलली.आणि धुवाधार बँटिंग सुरू झाली.नाळेतल्या पाण्याची पातळी वाढली नी ती अधिकचं सौंदर्यसम्राज्ञी भासू लागली.इतरांच्या डोळ्यातनं ती भयावह असेल पण मी अक्षरशः वेडापिसा झालेलो.उजव्या हातात छत्री सोबत मोबाईल कँमेरा.डोळ्यांनी सगळं अफाट/अचाट सौदर्य पिऊन झालं की मग कँमेरा आपलं काम करू लागायचा.वर ढगांची दाटी.ओथंबलेले आकाश.बेलभंडार उधळण्याच्या तयारीत.
स्वप्न आणि सौंदर्याचा मखमली मिलाप सा-या अंगात..रोमारोमात संचारला होता.
इतर भिडू जरा हबकून गेलेले.तरी एक एक पाऊलं पडती पुढे असं सुरू होतं.सौंदर्य आणि थरार यांची मिलीजूली भगत कमाल रोमांचक होती.भोरांड्यानं जणू लावण्यवतीचं रूप धारण केलं होतं.
●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
" प्रवाहाच्या विरूद्धही भिडू दमदार चढाई करत होते.जणू बळ संचारलं होतं.बरं..आता इथे दम सोडून उपयोग नाही.इज्जत जाण्यापेक्षा होले होले चलते रहो भै.जो तो आपल्यालाचं बजावत होता.वर बघायचं..मग खाली वळून बघायचं ..नंतर पाऊल उचलायचं.असे अनेकांच चाललेलं.खरं तर परिस्थिती तशीचं होती.पण ट्रेकिंगमध्ये हाच तर थरार महत्त्वाचा.मुळूमुळू ट्रेक लक्षात रहात नाहीत.अवघड,वाट चुकलेले,धडपडलेले,हाल झालेले,रात्र झालेले,काहींनी दम सोडलेले ट्रेक्स सर्वांच्या दिर्घकाळ स्मरणात रहातात.त्यावर अनेक मैफली रंगतात.गप्पांच्या बैठका होतात.त्यातनचं सुख-समृद्धी नांदत रहाते.
☘️
पाऊसाधारांचा अभिषेक सुरु असतांनाच सर्व भिडू तो अचाट खळखळता पँच चढून आले.मग सिंगल लेन चढाई सुरू झाली. झ-याची सोबत आणि कारवीची मदत यामुळे कष्ट सहन करण्याची उमेद मिळत होती.आणि एकदाचे हिरव पठार लागलं नी सर्वांच्या आनंदाला पारावर राहिला नाही.जरा थकलेले अनेक चेहरे उजळून निघाले.एक कठीण नैया पार झालेली.सगळे मोकळे झाले.छातीवरचे धोंडे हलले.आता नाणेघाट यू ही उतरू.त्याचं काही गम्य नव्हतं.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
मागचे सगळे येईपर्यंत थांबलो.राऊंड केला.काऊंट झाला.कोणी राहिल..हरवलं तर नाही ना.30 चा आकडा आला नी जरा च्याऊम्याऊ खात पाऊसच्या धारा अंगावर पडू देत होतो.धुक्याचं साम्राज्य पसरलेलं.हिरवाकंच गालीचा अंथरलेला जणू.
चला..
इकडे अवघ्या शरीरात धुक्याचा अभंग गुंजू लागला..
" धुके माझ्या अंगी !
धुके माझ्या चित्ती !
विठू जगजेठी
निर्भरला !!
☘️
नाणेघाटाच्या दिशेने सुटलो.पुढे टाररोड लागला.पर्यटक गाड्यांची वर्दळ वाढली.तोचं पुढे पोलीस बंदोबस्त आहे असं समजले.काही नाशिक-पुढे पाठवले.काही परिस्थिती आहे याचा अंदाज घ्यायला.पण कुठलाही त्रास न होता नाणेघाटाकडे वळालो.धो धो पाऊस कोसळत होता.बेभानपणे..⛈️आवर कोण घालणार.??
नाणेघाटाच्या प्रवेशद्वारावर उजवीकडे एक कातळरांजण उभा आहे. सातवाहन राजवैभवाचा खरा साक्षीदार.जकातीचा रांजण.आजच्या टोलनाक्या सारखा.ह्या रांजणाने किती कार्षापण,होन,ग्रीकड्रँक्मास,अरेबियन दिनार बघितले असतील.याची मोजदाद नाही.
☘️
सर्व गुहेत पोहचले.
राणी नागनिकेच्या शिलालेखांची गुहा.गुहेतल्या उध्वस्त शिलालेखांवरून हरवलेल्या नागवंशीय राजकुलाच्या आश्रयाची हिचं ती गुहा.दक्षिणपथपति राजा सातकर्णी आणि राणी नागनिका यांची गगनगुहा.आजही सुस्थितीत.कधी कुलूपबंद असते.गतवैभव काळात येथे किती पाथस्त/व्यापारी थांबले असतील,राहिले असतील.सहज विचार मनाला शिवून गेला.विचारांनी प्रसन्नतेची एक शानदार झुळूक आल्यासारखी वाटली.
☘️
इकडे पान-पंगत बसली.मनसोक्त आहार विहार पार पडलेला.मघाशी आनंदाची भूक मिटली होती.आता पोटाची भूक शमलेली.पँक अप होतोय,तोचं दोन पोलीस येऊन गेले.ट्रेकर आहेत सर्व तुषारने माहिती पुरवली.आमची गाडी खाली आहे.जेवण झालंय आता उतरायला सुरुवात करतो वैगरे..समजदारीने त्यांनी काढता पाय घेतला.
☘️
जेवण आटपून सर्व लगेचं उतरायच्या तयारीला लागले.मलाचं आश्चर्य वाटले.थोडा आराम करू म्हटलं तर ..नाही नाही निघू लगेचं.😥
माझी वामकुक्षी राहिला ना.😡पण काय करणार.सर्व सँक लटकून उतरू लागले.मी आपला बापडा गुमान मागे निघालो.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

■ हाच तो ऐतिहासिक नाणेघाट.
सातवाहन सत्ताधिश्यांचा राजघाट.
नर्मदेच्या गोट्यांसारखे गुळगुळीत फरसबंदीचे दगड.काबाडीच्या बैलांच्या टापाखाली झिजलेले जणू.
सततच्या पाऊसामुळे निसरडे झालेले.त्यात धो धो मुळे त्यावरून तळकोकणाकडे धावत सुटलेले पाऊसपाणी.आनंदगाणी गाणारं.
लता गाऊ लागली..

आनंदी आनंद गडे..
इकडे तिकडे चोहिकडे..
किती गोड आवाज लताचा.
कमालीचा..!
☘️
घाटात..मस्त मजा येत होती.थोडा आराम आणि पोटपूजा यामुळे सर्वचं ताजेतवाने झालेले.पाऊसाचा जोर ओसरलेला.तरी सर्वत्र खळखळाट चा घुमणारा आवाज धुंद करत होता.कारवीची सोबत होती.नाणेघाट उतरायला तसा सोपा.जणू हायवे.पण तरी पायथा पोहचायला दोन तास लागले.पाऊस आता पुर्णपणे थांबलेला.मागे नानाचा अंगठा आणि उंच कातळकडे स्पष्ट दिसू लागले.माथ्यावर असताना धुक्यामुळे अनेक व्हू बघायचे राहिले.पाऊसाळ्यात हे असचं असतं.तो एक दाखवतो दूसरं लपवतो.पुन्हा येण्यासाठी निसर्ग अश्या अनेक क्लुप्त्या लढवतो.प्रत्येक ऋतुत सह्याद्रीचं सौंदर्य वेगळं.तिथला निसर्ग, हवा,पाणी, झाडी,फुले,रानमेवा,आकाश,सुर्योदय,सुर्यास्त,मुक्काम असे सर्व विशेष पदर अनेकविध गुणवैशिष्ट्य्यांची.ते तुम्ही सतत फिरता तेव्हा ते आपोआप लक्षात येत जातात.
खरं सह्याद्री सुत्र त्यात दडलेल आहे.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

☘️पायथ्याशी पोहचलो.
तीन चार ओहळ लागले.
इतके भिजूनही इथे पाण्यातली मजा आणि फोटोग्राफीसाठी सर्व जणू आसुरलेले होते.
सर्व भिडू रिलॅक्स मुडमध्ये आनंद उधळण करत होते.सर्व सुखरूप आणि फिट अँड फाईन असल्याने परतीचा आनंद तो काय वर्णावा..!!!
मागे वळून बघितलं.
करड्या रंगाचे जिरेटोप घातलेला नानाचा अंगठा.
केवढा उतुंग झेपावलेला.
त्याला स्पर्शून खाली उतरायला लागलो होतो.
याचं अप्रुप याक्षणी मनाला सुखावणारं.
प्रत्येकवेळी इथला निसर्ग वेगळा वाटता.
आणि अनुभवही वेगळा.
त्यामुळे इथे येण्याचा कधी कंटाळा नाही येतं.
असे कितीतरी सह्याद्रीतले कोहिनूर आहेत.
ज्यांच सहा ऋतुतलं लखलखणं मोहून टाकणारं असतं.
त्यातलाचं हा संपूर्ण परिसर.
माळशेज घाटाच्या पश्चिम बगलेत ट्रेकर्स जमातीचा 
आत्मा दडलेला आहे.
आणि पलीकडे हरिश्चंद्राची मांदियाळी तेथ कळसू/अलंगपर्यंत विस्तारलेली.
ती या जमातीची जिती जागती ह्रदय स्पंदने आहेत.
आत्मा नी स्पंदन याशिवाय जगणारा तो ट्रेकर कसला..!
जीव ओवाळून टाकवा असा सह्याद्रीनामा इथे उभा आहे.
इथल्या अणूरेणूत माझ्या भटकंतीची बीजे रोवली गेली आहेत.
कधी काळी..
माझ्या जगण्याला इथे दिशा मिळाली आहे.
आनंदघनाची वाट इथेचं गवसली नी आयुष्य नी जगणं
समृद्ध झालं ते इथल्या वा-या- वावटळाच्या संगतीने.

या जन्मावर या जगण्यावर
शतदा:प्रेम करावे..

हे गाणं जगलो अक्षरशः..
ते सह्याद्रीच्या पाठबळामुळे.
तोचं माझा मायबाप आता..🙏

जड अंत:करणाने नानाचा निरोप घेतला.
नाणेघाटाला 'गुडबाय' करत रस्त्यापलीकडे हाँटेलवर पोहचलो.
कडक चहाचा आस्वाद घेतला.तोपर्यंत गाडी आली.कपडे बदलले अर्थात शहरी साज चढवला आणि आपल्या घराकडे परतीला निघालो ते बाप्पाचा गजर करत.
गणपती बाप्पा मोरया...❤️

समाप्त
🙏🚩
संजय अमृतकर
all rights reserved 
★★★★★★★★★★★★★
दिनांक 12 सप्टेंबर रविवार..
प्रस्थान सकाळी 5:20 मुंबई नाका
रिटर्न रात्रो 10:10
26 सिटर टेपो ट्रव्हलर.

सह्यमित्र :आरव मंत्री,कार्तिक/सुरेश दुबाले,डॉ. स्मिता,डॉ. अविनाश,आस्था गाडेकर,प्रिया घोगरे,सोलर रोहित,परमसियान,किरण काळे,जयंत धामणे,स्मिता,ऋतुजा,भारत बोरसे,आशिष/अमोद अमृतकर,संजय अमृतकर..
अश्विनअलई,विपिन चौधरी,ऋषिकेश सामनवार,संतोष पाटील,रूपाली जायखेडकर.मनिष ठाकूर
पुणेकर...तुषार कोठावदे,संदिप वडस्कर,विजय गुजर,दादू,क्षितिज,छाया लांडे मँडम.

★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★★
Photos Gallery

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

The end 🙏
Please Comment 👍

Comments

  1. Great Experience With Great People At Great Trek...
    Nice write up Nanashri

    ReplyDelete
  2. लेख वाचताना प्रत्यक्षात परत एकदा जाऊन आलो असेच वाटते आहे. अप्रतिम लेख सर 👌👌

    ReplyDelete
  3. नेहमीप्रमाणे मस्तच , नाणेघाट ,नानाचा अंगठा आणि सोबत नाना असा योग येणे सुध्दा भारीच

    ReplyDelete
  4. नाना फारच छान … असेच ट्रेक आम्हाला बरोबर घेऊन जात जा व असेच छान छान लिहीत रहा.

    ReplyDelete
  5. Nana, its as usual अप्रतिम. Felt like I was moving with u under the rains. Wish I were there. श्रीकांत ओक

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद श्रीकांत 🙏😀

      Delete
  6. व्वा, नाना.. छान भटकंती, छान वर्णन! धुंद धुक्यात, बेधुंद पावसात एक अफलातून भटकंती केलेली दिसतेय. फोटोही खूप सुरेख.. हे सारं बघून घरात जीव वेडापिसा होतोय. कधी संपेल हा सह्यदूरावा, असं झालंय. पुढच्या भटकंतीसाठी गोड शुभेच्छा!

    ReplyDelete
  7. नाना अप्रतिम blog, आपल्या ब्लॉग ने पूर्ण ट्रेक जसाच्या तसा घडवला. असं वाटतयं आमचा एखादा ट्रेक चुकला की तुम्ही त्या ट्रेक वर नक्की ब्लॉग लिहावा म्हणजे ट्रेक घरी बसुन अनुभवता येतो. नाना तुमच्या लिखाणात अधून मधून डोकावणारे अभंग, गाणे, चारोळ्या अगदी चपखल बसतात, लिखाणातले तुमचे शब्द तुमच्या प्रचंड वाचनाची साक्ष देतात, असेच लिहत रहा.......

    ReplyDelete
  8. नाना तुमचा ब्लॉग वाचून आणि फोटो पाहून नाणेघाट ट्रेकला येता आले नाही याचे फारच जास्त वाईट वाटलं, अगदी पोटातच दुखलं ना...खूप सुंदर जागा धबधबे तुमच्यामुळे पहायला मिळाले त्याबद्दल खूप खूप धन्यवाद पण नाणेघाट मात्र परत करा आम्हाला घेऊन...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एकतंगडी/शिवाजी घाट

अंगठेसरी/नाळेचीवाट