2 लोभस : लोभी अर्थात लोणावळा ते भिमाशंकर
लोभस : लोभी (भाग 2 )
प्रकाशन दिनांक १ आक्टोंबर 2021 शुक्रवार
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
राम राम मंडळी..🙏
गावाकडे पाऊसपाणी कसं काय..?
जोरदार आहे ना..?
असायलाचं पाहिजे ⛈️😀
अर्थात ते आपल्या हातात नाही.
म्हणून ..विचारले 😀
ठेवीले अनंते तैसीच रहावे 🤷
⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️⛈️
लोभी पहिला भाग लिंक..
http://sanjayamrutakar.blogspot.com/2021/09/1.html ....
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
★जांभिवलीतील दूस-या दिवसाची प्रसन्न सकाळ..
घराबाहेर आलो तर..
समोरचे डोंगर मात्र ढगात लपल्यासारखे.
हलकेस सुर्यदर्शन झाले.तितकाचं काय ती वेळ.
नंतर पुन्हा ढगाळ माहोल.
सूर्यावर बहिष्कार टाकण्याच्या इराद्याने तयारीतला आसमंत.
चहा पोहे आणि वाटाड्या घेऊन कुसूर पठाराकडे निघालो.नदी ओलांडून साधारण चढाई करत माथ्याकडे चाललेलो.
कधी कारवीचं दाट रान,कधी खुला आसमंत.
कुठे चढाई..कुठे सरळ चाल.🚶
☘️
कुसूर पठाराच्या चढाई अगोदर ढाकच्या बहिरीने आणि कळकरायने धुक्याची चादर अलगद काढून दिलेल दर्शन म्हणजे सह्याद्रीच्या मनोहारी पण पहाडीसौंदर्याची झलकच..खाली हिरवीकंच कोकणदरी नी ढाकच्या रोमहर्षक दर्शनाने सर्व भिडू आनंदून गेलेले.सुखाच्या साक्षात्काराने सर्वांचाच जीव हरखला होता.डोळ्यात आणि मनात सुखाचं चांदणं नांदत होतं.
★★★☘️
कुसूर पठारावर सोनकीच्या गालीच्यामधून जाणारी वाट त्यात वाऱ्याच्या झोतामुळे डुलणा-या बहारदार छ्टा,आणि आमची फोटोग्राफी साठी चाललेली धडपड कमाल होती.
नजर पोहचेल तिथंपर्यंत पाचूची नवलाई.
सा-या धरित्रीची काया हिरव्या रंगानं पुनीत झालेली.
सर्वत्र हिरवा गालीचा अंथरलेला जणू.
त्यात पिवळ्या सोनकीची बुट्टेदार नक्षी.
धजरेचं पारणं फेडणारी.
डहाळीडहाळीवर तजेलदार हिरवी नक्षत्रं बहरलेली.
सा-या चराचरावर नटलेला हिरवा उत्सव !
धरेवरची वैभवशाली हिरवाई आणि
आकाशातली मंद धूसर करडाई
यांचा अद्वैत संगम.
अंगभर लाभलेल्या वृक्षसान्निध्यांमुळे
गहिवरलेले कृतज्ञ डोंगर.
उपकृत भावनेनं उचंबळून आलेली त्यांची उन्नतविशाल
मनं दिवसांत वरूणराजाविषयी कृतज्ञतेची
गाणी गात असतील का ?
माझं मनं किती भाबड रे..
मलाचं माझा प्रश्न 😥
भावनांनी मनं गहिवरून आलं ..
★★★☘️
कुसूरला जेवणाची व्यवस्था केलेली.
मागचे सहकारी येईपर्यंत आम्ही सहा जनांनी जेवणाला सुरुवात केली.कारण गाडीत 7 व्यक्तींनाच जागा होती.इथून आम्हाला तळपेवाडी पर्यंत गाडीने जायचं होतं.काही वेळातचं बाकी सहकारी आले.जेवण करून आम्ही पुढे निघण्याच्या तयारीत असताना विनित दातेंनी पांढर निशाण फडकवलं.
म्हणाला" मला घरची आठवण येतेय.
पाऊलं उचलत नाही माझी.
मला जाऊ द्या.
यावर विजय..तुषार..अमीत मग काय बोलणार 🤷
दिली परवानगी.. जा मुला..दिल्या घरी सुखी रहा..!
★★★☘️
त्या आधी शिवलाल मंत्रींनी पांढरं निशाण
फडकवलं होते.
पण त्यांना नाशिकला महत्वाच्या कामासाठी जाणं गरजेचे होते.
हे आम्ही समजून होतो.त्यांच्यासाठी डॉ. हेमंत बोरसेंची गाडी व्यवस्था झाली होती.त्यांचा ग्रुप वन डे घाटवाट करण्यासाठी आला होता.आणि ते कुसूरहूनचं सायंकाळी परतणार होते.
☘️तर अश्या रितीने 14 चे 12 झाले.आणि आम्ही तेथून तळपेवाडी पर्यंत गाडीने पोहचलो.वाटेत तुफान पाऊस सुरू.
वाहून जातोय की काय इतपत.
वाटलं पुढे ट्रेक होतो की नाही.मला तर 'हाल' व्हावेत असचं वाटत होतं मनापासून.त्याशिवाय ट्रेक लक्षात रहात नाही.😀
17 किमी अंतर अर्धातासात पार झालं.आम्ही सहा तिथेच मंदिर शेडमध्ये मस्त आरामात बसलो.चहा घेतला.जरा पडलो तर इतर भिडू आलेही.तो पर्यंत पाऊसाचा जोर कमी झालेला.खरं तर पुढे जाऊचं नये असं सर्वांनाच वाटत होतं.मस्त तळपेवाडीतचं मुक्काम करावा.पण मग उद्याचं नियोजन धासळलं असतं.
म्हणून विषयावर लगेचं पडदा.🎬
आता " पडदा" वरून..एक धमाल गाणं आठवलं.
पडदा है..पडदा
पडदेपिछे..पडदा नही है.
महंमद रफी..अमर अकबर अँथनी सिनेमा
वाह...
क्या गाणा है..!!!
बजाव रे 💃💃
☘️ इकडे जड मनाने आणि पाऊलांनी
तळपेवाडीला बाय बाय केला.
वाटेला लागणार तोच एक वाडीतला मनुष्य भेटला.येतो का वाट दावायला..? क्षणात तो तयार झाला.आणि निघालो.स्थानिक व्यक्ती सोबत असली तर बरं असतं.भोवतालची सखोल माहिती मिळत जाते.
⛈️
एव्हाना पाऊस थांबला असला तरी सारा आसमंत दाट ढगांचा आणि धुक्याने वेढलेला.दुतर्फा हिरव्या गच्च शेतजमिनी.तासाभरात एक मनुष्य भेटला नाही की कुठे वस्ती दिसली नाही.मात्र एक दोनशे फूट धबधबा लागला.सोनवणेसरांनी नेहमीप्रमाणे स्वतःला डुबवून घेतलं.नी आम्ही पुढे निघालो.
या निथळत्या दिवसांत ग्रे रंगही तनमनांत शिरून
आनंदसूर मिसळवत होता.
त्याचे धुकाळ ओले हळुवार स्वर वातावरणात तरंगत होते.
सुसाट चालीनं स्वप्ने खळखळ वाहात होती.
रंगांचा एक मनस्वी सुंदर गोफ धावत्या
नजरेसमोर गुंफला जात होता.
ग्रे रंगाची पखरण असल्याखेरीज हे पर्जन्यस्त्रोत्र
पूर्ण होणे केवळ अशक्य.
हिरवे रावे..कडवे पारवे..
असा द्विपक्षी दैवदुर्लभ संगम ☘️
दिवस मावळतीकडे झुकलेला.अंधार पडायच्या आत पधरवाडीत पोहचायचं होतं.अजून तर वांद्रे खिंड दिसत नव्हती.पण हलकी चढाई.स्पष्ट ओली पायवाट.आणि सुसाट सुटलेली पाऊलं.
★★★☘️
आता ऐतिहासिक वांद्रे खिंडीच्या वाटेसाठी सज्ज झालो..
हा संपूर्ण प्रदेश म्हणजे असंख्य घाटवाटांची मांदियाळी..पश्चिम बाजूने तर अनंत घाटवाटा भिमाशंकराच्या जटांसारख्या पसरलेल्या आहेत.अनेक भटके तर इकडे पंढरीच्या वारी सारखे येत रहातात वर्षानुवर्षे.पाऊसकाळात तसे सगळेचं घाट चैतन्याने भारलेले असतात.नव्या नव्हाळीनं जणू नटलेले असतात.खरंच जादुई आहे सर्व.
★★★☘️
वांद्रे खिंडीच्या अलीकडे पोहचलो.पाच टाक्या पाहताना सहज मनात विचार आला,जेव्हा ह्या डोंगर वाटा पार करताना एखादा पाथस्त टाक्यांपाशी पोहोचतो तेंव्हा त्याला इथल्या स्वर्गसुखाची खरी किंमत कळत असावी,त्या अनामिक पाथरवटांना मनोमन साष्टांग घालावसा वाटला..किती योग्य ठिकाणी त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून ठेवली आहे.काही काळ थांबून निसर्गावलोकन केल्याखेरीज वांद्रे घाटाची सौंदर्यपुजा पुर्ण होऊचं शकणार नव्हती.मागचे भिडू येईपर्यंत तिथेचं रेंगाळलो.
हळूवार सुख अनुभवत बसलो.☘️
तेथून वांद्रेची हलकी चढाई.किरकोळ झाडोरा.मावळतीचे रंग काळसर होऊ लागलेले.आभाळ भरून आलेलं.सकाळपासून चिंब भिजायचं राहिले म्हणून की काय पाऊस जणू डूक धरून होता.😀 खिंड उतरेपर्यंत काळोख पसरलेला.चाचपडत मिट्ट अंधारात पढरवाडीत येऊन ठेपलो..
☘️
पधरग्रामस्थ भगवानच्या उबदार घरात पोहचलो.तसा अंमळ उशिरच झालेला.तो वांद्रेच्या पायथ्याला येऊन गेलेला.पण भेट झाली नाही म्हणून परतला.बँटरीच्या उजेडाने पुन्हा आम्हाला घ्यायला पुढेपर्यंत आला.आज काही चिंब भिजलो नाही.तरी कोरडे कपडे घालून फ्रेश झालो.कडक चहा झाला.पुन्हा गप्पांची मैफिल.पुन्हा नव्या जुन्या आठवणींना उजाळा.पोद्दार बाबा महाराज पुणेकरांच किर्तन झालं.तो पर्यंत जेवण तयार झालं.मग माजघरात पोटभर जेवलो.माऊलीला धन्यवाद दिला.आणि
" झोपा रे आता..म्हणून निद्राघरात शिरलो.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
★
सकाळी पुन्हा सज्ज झालो पुढच्या प्रवासासाठी.
थकवा नव्हताचं.शानदार झोपेने शरीर हलक झालेलं.
मस्त चहा पोहे हाणले सर्वांनी.
आजचा पल्ला तसा सोपा होता आणि तेवढाच सुंदर देखील.पधरवाडी आणि भगवान कुटुंबाचा निरोप घेतला.निरोपाची वेळ तशी मनं ओलं नी हळवं करणारी.आतिथ्यशिलता हा यातला दुवा आहे.
★ वाटाड्याच्या मागे निघालो.थोरवयी वाटाड्या.डोंगरी पेहराव चढलेला.पण माहितीगार..! नदीपात्र ओलांडून मार्गी लागलो.उजवीकडे जुनी जाणती झाडे आणि दमछाक करणारी चढाई.एका टप्यात चढाईनंतर हायवे लागला.माती/मुरूमाने सजवलेला गाडीरस्ता.काही अंतरानंतर डावीकडे झाडीत घुसलो.पुढे पुन्हा एका नदीला ओलांडत निसर्गमयी पठारावर चालू लागलो.सुखाचं आभाळ भरून आलं होतं.
★सकाळचं धुक मनोहरी प्रसन्न.पायाखाली हिरवा गालीचा.
कुठे दाट कारवीतनं चिवळ वाट कधी मोकळा आसमंत.
सोनकीचे भाऊबंद टप्प्यावर भेटणारे.
कुठे शुभ्र स्पटिक पाण्याचे खळखळत वाहणारे निर्मळ प्रवाह.
भूल पाडणारी पावलं थबकवणारी निसर्गस्थळे.
असं दृश्य दिसणं आणि अनुभवण हे केवढं सुख.
कुठल्या जन्मीची पुर्वपुण्याईने हे दिव्य अलौकिक दर्शन घडत होतं.प्रत्यक्ष परमेश्वराचं निर्गुण निराकार दर्शन घडत असल्यासारखी मनाची आनंदमय अवस्था झालेली.
मनाच्या उत्कटतेला वेगवान धुमारे फुटवणारा तो एक रसरशीत अनुभव होता.
★धुक्यात हरवलेल्या वाटेने पहिल्या टप्प्यात डावीकडे खेतोबाच्या दर्शनाला सज्ज झालो..पण तो गावलाचं नाही.एकुणचं घाटवाटांवरच्या सगळ्या देवतांची आवडणारी गोष्ट म्हणजे या देवतांना कोणत्याही साजशृंगाराची अपेक्षा नसते.ना छता अंबराची.वर्षानुवर्षे या देवता येणाजाणाऱ्या पाथस्तांवर आपली कृपादृष्टी ठेवून आहेत..म्हणून कुठलाही मनुष्य डोंगर द-यांत निर्धास्त भटकू शकतो.हिरवे डोंगर. त्यांच्या भोवती जमलेली धुक्याची अस्फुट धूसर भाबडी माया.आम्हाला जणू गुंतवून टाकणारी.
☘️
★कमळजाईच्या मंदिरात हलकासा स्पर्श करून अंग मोहरून घेतलं.यासारखा भक्तिभाव तो कोठला.वाटाड्याने निरोप घेतला.बिदागी हातात घेतांना केवढा आनंदला होता तो.
डोळ्यातले भाव कमालीचं हलवून टाकणारे.
तेथून मग सुसाट सुटलो.आता वाट तशी सहज सोपी.
मनी भिमाशंकराची ओढ लागलेली.
सगळ्यांचीच पाऊलं वेगवान चालू लागली.
थोड्या वेळात उजवीकडे दूरवर भोरगिरी गांव दिसले.
सहाएक वर्षापूर्वी भोरगिरी भिमाशंकर ट्रेक केलेला.
आठवणीपट उलगडू लागला.
पुढे भिमाशंकराकडे जाणाऱ्या त्याचं वाटेला जाऊन मिळालो.
☘️
★आता मात्र 3 दिवस सतत चाललेल्या शरीराला नितळ पाण्यात डुबविण्याची गरज होती..मग काय भिमानदीत सर्व मनसोक्त डुंबले.कल्लोळ केला.शरीर हलकं करून घेतलं.जादुई पाण्याने मायेचा हात फिरवला.महादेव पावल्याचं ते द्योतक होतं.
आणि पुढच्या वाटेला लागलो.वाटेतल्या एका अनाम वीराच्या स्मृतीशिळेच दुरूनच दर्शन घेऊन शेवटच्या टप्प्यात आलो. गुप्त भीमाशंकराच्या वाटेवर दूरवर एक शेकरू थोडा काळ दर्शन देऊन पुन्हा जंगलात नाहीसे झालं..प्रमोदने ते क्षण अचूक टिपले नी भटकंती सार्थक झाल्याने त्याच्या चेहराही लख्ख उजळला.
☘️परतीच्या शेवटच्या टप्यात आलो असताना..
गेल्या तीन दिवसांच्या भटकंती वाटेवरची ती रानफुले,
तो झोंबणारा मोहमयी वारा,गच्च हिरव्या शालूने सजलेली हिरवीशार पठारे,टप्याटप्यावरच्या इतिहास पाऊलखुणा आणि मल्हार सह्याद्रीने मुक्त हस्ते केलेली सौंदर्यची अभूतपूर्व उधळण..
या 70 एम एम सिन्यारियोतच जणू हे मन अडकलय.सारा पट डोळ्यासमोर स्लाईड शो सारखा फिरू लागला.
☘️ पाच वर्षीपुर्वी हाच रूट केलेला.पण अपवाद स्थळाच्या आठवणी सोडल्या तर सारं नवीन कोर वाटत होतं.भिमाशंकर परिसराचं नी माझं एक वेगळ नातं उतुंग विशाल मनाच्या मित्रासारखं सतत ओढ लावत आलं आहे. सतत आकर्षित करत आलं आहे.
त्याच्या पुढच्या चैतन्य भेटीची मी आतुरतेने वाट बघत राहिन.
☘️
"ओळखिची तरीही नवखी आज दिसते का गडे ?
वाट मज ती आवडे !
सोनकीचा बहर तो पिवळा,वरून बोले तो निसर्ग वेडा,
आज मना लागते का साज नवा.?
वाट मज ती आवडे..
सहज ओळी आठवल्या..कोण्या कवीच्या
परतीला निघताना..
माझ्या डोळ्यातल्या पाण्यानं किनारा गाठला होता.
घरापर्यंत ओल टिकून होती.
मात्र श्वास मोकळा झाला होता.
I never spoke with God,
Nor visited in heavens ;
Yet certain am I of the spot
As if the chart were given."
🙏
धन्यवाद 💐
संजय अमृतकर
Gypsy trekker
nashik 🚩
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
लोभी
ट्रेक दिनांक 25/26/27 सप्टेंबर 2021
(शनिवार/रविवार/सोमवार)
सोबती : नाशिककर - विठ्ठल सोनवणेसर, शिवलाल मंत्री, अनुराग शिरोडे, ऋतुजा धामणे, संजय अमृतकर
पुणेकर : तुषार/प्रशांत कोठावदे, विजय गुर्जर,अमीत मराठे,चिन्मय किर्तने,प्रमोद पोद्दार, विनित दाते,संजय राणा.
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
🙏 आठवले काकांचे विशेष कौतुक.
दमदार चाल आणि सालस व्यक्तिमत्त्व.
🙏विजय आणि विनित ह्या दोघांनी सुरेख नियोजन
केलेलं.हवहवसं वाटणारं.दोघे दिलखुलास सदाशिव पेठेत
न शोभणारे.😀माधुरीनंतर घायाळ हसणं असलेला तो एकमेव विजय.
🙏अमीत म्हणजे वाट चुकलेला माणूस.बँकेंची जबाबदारी शिरावर असताना निर्मळ मनाने भटकतो.खरं तर साहित्यिक अंगाचा माणूस.सह्याद्रीत प्रेमात आकांड बुडालेला.
🙏तुषार व प्रशांत भाऊ असून मित्रासारखे सोबती.
हल्ली कुठे बघायला मिळतं असं.दोघे कलामनाचे.
तुषारबाबत पुस्तकचं लिहितोय 😀धडाडीचा नी बिनधास्त भिडू.
🙏ह.भ.प.पोद्दार महाराज म्हणजे मोकळा माणूस.
ऋषिकेशला भेटायला हवा.
🙏चिन्मय किर्तने म्हणजे पोर्तुगालहून आयात केलेला भिडू.
टिपिकल सजवलं तर कोण मराठी माणूस म्हणेन.
आभ्यासू,हुशार, मितभाषी.हवाहवासा.
🙏विठ्ठल सोनवणे सर म्हणजे जिगरी यार.मित्र असावा तर असा.
बडेजाव नाही.अहं नाही.सह्याद्री आणि फोटोग्राफी वेडा माणूस.
मागच्या जन्मी 100℅ शार्कमासा असावे.😀पाणी दिसलं की अंगात येते यांच्या.
🙏शिवलाल म्हणजे मरीन इंजिनिअर.शिपवरून सुट्टीवर परतले की किती फिरू..नी कुठे फिरू असं होतं यांना.सायकल,रनींग, ट्रेकिंग यांचे विकपाईंट.
बरं सोबत चिल्लर पण साहसी मुलांना घेतात.
🙏ऋतुजा म्हणजे हुशार..उत्साही मुलगी.
ट्रेकर,ब्लाँगर,वाचन आणि इतरही भरपूर आवडी.
उज्वल भविष्य असलेली जिप्सी 🚩
🙏अनुराग म्हणजे सळसळता तरूण.
स्मार्ट असूनही काळा होण्यासाठी सह्याद्रीत भटकतो.
सायकल वेडही आहे भिडूला.दमदार आहे.
🙏 माझ्याबद्दल न बोललेलं बरं.😜
⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️⛰️
Reserve Photo gallery 📸 👇
🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬🎬
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
तळपेवाडी हून पुढचा ट्रेक..
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️
त्याला जपा..त्याचा आदर करा.
सन्मान ठेवा.
धन्यवाद 🚩
The End 🙏

सह्याद्रीमध्ये अशा भन्नाट वाटा त्याही जीवलगांसोबत म्हणजे मागच्या जन्माचे पुण्यचं! अशाच अगणित वाटा सोबत अनुभवयाला मिळोत!
ReplyDeleteव्वा, नाssना! आता तर धमालच सगळी!
ReplyDelete😊
पहिल्या भागापेक्षाही अधिक जादुई छायाचित्रांच्या उत्सवी नि नशिल्या 'बरसाती'त नि वाक्यागणिक अलंकारिक शब्दसौंदर्याची मोहक पखरण करत आणि आपल्या 'त्या' अंतर्मनातुन सहजसुंदररित्या ओघवणाऱ्या मनस्वी लेखणीतुन मादक धुक्यातील गोड दवबिंदुरुपी शब्दसौंदर्यानं मस्त भिजवत बहारदार निसर्गनवलाईतून छान नि दमदार फिरवून आणलंत की.. !!
😍
व्वा, छान, अगदी 'धमाल की कमाल'च नाना! बहोत खूब!!
👍👍👍