अंगठेसरी/नाळेचीवाट
अंगठेसरी/नाळेची वाट
🏔️🏔️🏔️🏔️🏔️🏔️🏔️
16/03/2022
अंगठेसरी / नाळेची वाट
कांदाट खोरे
ता.महाबळेश्वर जि.सातारा√
★★★★★★★★★★
मी जगभर प्रवास केला√
नद्या आणि पर्वत पहाण्यासाठी दूरवर भटकलो
सारे काही पाहिले आणि अचानक
एक दिवस मला दिसला,
माझ्याचं घरातल्या अंगणातल्या आणि
एका गवताच्या पात्यावरील दवबिंदू.
एक दवबिंदू..
ज्याचा इवल्याशा परिघात भोवतालचे सारे
जग प्रतिबिंबित झाले होते.
रविंद्रनाथ टागोर
🌱🌱🌱🌱🌱
गेल्या काही वर्षांत..
बकेट-लिस्टमध्ये
अनेक ट्रेक असे लायनीत उभे आहेत.
कधी कोणाचा नंबर लागेल..
हे काही सांगता येत नाही.
बरं..
काही ट्रेक तर अनेक वेळा ठरवून
पुढे ढकलत आलो आहोत.
पण 2022 वर्षात पेंडींग लिस्ट मार्गी
लागत आहे.हे मात्र खरं.
☘️
यातल्या काही नियोजनात विजय गुर्जर
(पुणेकर व्हाया सदाशिव पेठ)
हा माझा भाचा सतत संपर्कात असतो.
त्यामुळे आशेला धीर असतो.
आणि धीराला शाश्वती असती.👍😀
🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴
" जावळीचं खोरं "
म्हटलं की सह्याद्रीचं रौद्ररूप आणि घनदाट जंगल डोळ्यांसमोर उभं रहातं.
मग आपसूक शिवकाळातला तो काळ आठवतो जो जावळीचे राजे चंद्रराव मोरे आणि दस्तुरखुद्द शिवाजी महाराजांमध्ये झालेल्या संघर्षाचा आणि नंतर लढाईचा.आपल्याचं राज्याना आव्हान देऊन स्वतःचा मृत्यू ओढवून घेतलेले तेचं चंद्रराव मोरे.पण एकूणचं ह्या संपूर्ण जावळीच्या खो-यात भटकतांना सतत जाणवत रहातं की मो-यांचं साम्राज्य किती बुलंद आणि करारी होतं.घनदाट जंगल आणि असंख्य चोरवाटा,उतुंग पहाड आणि टप्प्यावर वस्त्या. त्यामुळे हा संपूर्ण परिसर स्वराज्यासाठी किती महत्त्वाचा होता किंवा तेंव्हा असेल हे आपल्याला आजही जाणवतं.
असो..
शिव-इतिहास हा विषयचं आपलं स्फुर्तीस्थान आहे.
गुंतवून टाकणारा विषय आहे.
त्याखोलात जेवढे जाल तेवढे भावनिक होणार.
★★★★★★★★★★★★★★★★★★
🚩
" कांदोशीला पोहचायला पहाट झालेली.
काल सायंकाळी बरोबर 6:10 वाजता नाशिक सोडलं.
आणि आता पहाटेचे 5 वाजलेले.बरोबर 11 तासांचा प्रवास करत पोहचलेलो.गाडीत झोप कुठे लागते.
सतत हलचल असल्याने ते शक्यही नाही.
पुणेकर मंडळी 2 तास आमच्या आधीचं येऊन झोपलेली.आम्हीही एका पडवीत दिली ताणून.तास दोन तास गाढ झोप मिळाली तरी भाग्य.कारण आज अंगठेसरीचा बुलंद पहाड चढायचा होता नी रग्गड चालत कांदाट वस्तीला मुक्कामी पोहचायचं होतं.
☘️
उठा रे..
काय झोपायला आले का ?
कोणीतरी ओरडलं.
मिचमिचे डोळे उघडले.. बघतो तर सोबतचे भिडू उठून आवराआवर करत होते.मी पण झपाट्याने आवरायला घेतलं.बाहेर येऊन बघतो तर दोन चार शानदार बंगले नी अप्रतिम असं नवंकोरं मंदिर नजरेचं पारणं फेडत होतं.कुणी स्थानिक ठाणे शहरात स्थाईक झाला नी राजकारणात मोठा झाला.त्याची घरं मोठी झाली नी इतर सुधारणाही झाल्या.
अशी माहिती मिळाली.
रहदारीपासून इतक्या आत वस्तीला एवढा आधुनिक बाज कुतुहल निर्माण करत होता.मंदिराच्या लगतचं स्वच्छ सुंदर बाथरूम अनुभवून आम्ही तर अवाक् झालो.
☘️
प्रसन्न व ताजेतवाने होऊन आम्ही कांदोशी सोडलं.
हाकेच्या अंतरावर एका मामाकडे आमची चहा नाश्त्याची व्यवस्था केलेली.तिथे दहा मिनिटांत पोहचलो.तो पर्यंत आसमंत तर भरून पावलेला.चौफेर सह्याद्रीचा गराडा पडलेला.उंचावरून कांदोशीचं सौंदर्य अधिक खुललेलं.
मामाकडे चहा-पोहे झाले. नी
अंगठेसरीला भिडलो.🚶वेळ 8:35 मिनिटे.
तेजतर्रार असे 24 भिडू तालेवारपणे चालू लागले.
विरळ झाली.. खडी चढाई.
सकाळची प्रसन्न हवा.माहोल तर आल्हाददायक.
सापवळाची वाट उत्तोरोत्तर अधिक छातीवर येऊ लागली.
तशी पाऊलं मंदावली.
अंगठेसरीचा अर्थ सर्वांच्या लक्षात येऊ लागला.😀
भाता जसा फुलत गेला..तशी दमछाक वाढली.
सुदैवाने कोकणचा दमटपणा यावेळी नव्हता.
त्यामुळे आस्ते कदम...
पण प्रवाही होतं.
इतक्या सोबतींना बसायला कुठेशी सलग जागाही नव्हती.
यावरून तिथल्या परिस्थितीचा अंदाज येऊ शकतो.
घोट घोट पाणी पिणं.
मिळेल तिथे बसून चटरफटर खाणं.
गप्पा आणि हसीमजाक यामुळे सर्वकाही
नार्मल लेव्हलला होते.
☘️
उनं ब-यापैकी अंगावर येऊ लागलं.
कारवीची सोबत म्हणजे आधार.
वाट म्हणजे पाऊलवाट एवढीचं.
तीही घसरडी नी 70/80 अंशात चढणारी.
काल झोपलोचं नाही ..
याचं भानही विसरले सर्व.😀
नंतर कारवीनेही सात सोडली.
उजाड वाट.
टप्प्या-टप्यावर ग्रुप विभागले गेले.
जो तो पुढच्या मागे मी असं दमदार
चालत होता.🚶
पाठीमागे खाली नजर फेकली तर इवलंस
कांदोशी उठावदार दिसतं होतं.
बाकी सर्व बहारदार सह्याद्री नजराणा सोबतीला.
☘️
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
★ आणि ..
एका भिरभिरणा-या ट्रव्हर्सने वाट अडवली.
पाऊलवाट होती स्पष्ट.पण डावीकडे ड्राँपही मोठा होता.
त्यामुळे आवश्यक त्या ठिकाणी सुरज,तुषार यांनी आधारासाठी दोर लावला.नी सर्व सावधपणे पलीकडे पोहचू लागले.एक क्षणी नांगरदारची आठवण आली 😀
खरं तर दोर पुढील वळणावर लावायला हवा होता.
कारण तिकडे तर अजून थरार वाट अंगावर येणारी.
घसरडी.आधारही नाही कसला.साधी झुडपंही नाही
तरी सर्व भिडू सुरक्षितपणे वरच्या टप्प्यावर पोहचले.
खालच्या टप्प्यावरून वाटत होतं की आला माथा.
पण कसलं काय.
सरळ चढाईनंतर उजवीकडे अजून एक थरार वळण
आमची वाटचं बघत होतं.😀
ते पार करून डावीकडे एका घळीत विसावलो.संत्री,सफरचंद,लिंबूसरबतचं ओझं कमी झालं 😀
आणि ..
पुन्हा चढाईचं आव्हान स्विकारलं.
☘️
मघापासून भरल्या पोटाचे मेघ आकाशी गर्दी करत होते.
त्यामुळे उन्हाचा त्रास बिलकूल नव्हता.
माथ्यावरची गार झुळूक सुखावत होती.
पण माथा काही दिसेना.
पुढचे भिडू सुसाट निघालेले.
आमची मागची टिम जरा रमतगमत चाललेली.
वाट चुकली पण लगेच सावरली.
मात्र तापमान अंशात वाढलेलं.
त्यामुळे फुसफास सुरू होती.
तोचं..
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
किरकोळ पाऊसवर्षाव सुखावू लागला.
पंधरा मिनिटांच्या गारेगार शाँवरने ..
" मौसम बदल डाला था...🌧️
सारा जावळी मुलुख जणू चिंब भिजला.
टेंप्रेचर 34/36 वरून थेट 22/24 वर आलेलं.
हा बदल कमालीचा सुखावून गेला.
कांदाट खोरं या हलक्या तुषारांनी कमालीचं
मोहक आणि उल्हासित भासत होतं.
🌱
पावसाळ्यात काय धमाल असेल.
फक्त विचारांनीचं चिंब भिजल्यासारखं झालं.
शेवटचा टप्पा जोरकसपणे चढलो..नी
एकदाचा हवा असलेला माथा गाठला.
हलक्या पाऊसामुळे वाट जरा ओलसर
पण सुखकारक झालेली.
🌱
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
एका मोकळ्या पण तटावरच्या
जागेवर जेवणावळ बसली.
दूरवर...
रसाळ, सुमार आणि महिपतगड त्रिकुट
शिस्तबद्ध रांगेत उठावलेले.जगबुडी नदीचं खोरं
वरून कमाल मनोहरी दिसत होतं.
सात-आठ वर्षापूर्वी तिथली भटकंती नजरेसमोर
तरळू लागली.
रसाळ व महिपतचा मुक्काम चिरंजीव झालेला.
तेंव्हा..
सह्यमित्र डॉ. हेमंत बोरसेंचं नियोजन काटेकोर.
मजा आलेली तेव्हा.😀
☘️
आठवणीत रहाणारी जेवणावळ संपली.
बाजूलाचं अडीच - तीन हजार फुट
उंचीचा कातळकडा सरळसोट उतुंग.
छाती दडपून टाकणारा.
तरी..
मौसम तर बढिया होता.
मार्च महिन्यातही जूनचा फिल 🌧️😀.
आता..
आमचा मोर्चा उजवीकडे झाडणी गावांकडे वळाला..
मग तेथून झाडणी नंतर तांबोट/तांबट धारेने
कांदटला मुक्कामी पोहचायचं होतं.
तिस-या प्रहराचा बिगुल वाजलेला.
अंधाराच्या आत कांदाट गाठायचं असं
सुरज मालुसरेचं नियोजन.
आम्ही मात्र..अंधार काय तर रात्र व्हायला हवी.
सोबत हालही व्हायला हवेत.
धडपडायला पण हवं.
बँट-या आणल्या आहेत.
त्या का फक्त सँकमध्ये झोपायला ???😀
☘️
आता इथे कुठे फारशी चढाई नाही.
कुठे विरळ..कुठे दाट झाडीतनं वाट
धावत सुटलेली.फक्त चालत रहायचं.
दूरवर रेंजेस तर कमाल दिसत होत्या.
अगदी पाठीमागे वळून बघितलं तर महाबळेश्वर,मधुमकरंदगड,कोंडनाळचं मुख,
मग डावीकडे नजर फिरवली तर,
रसाळ,सुमार,महिपत आणि समोर डावीकडे
पर्वत्या दिमाखात उभे.चौफेर नजराणा सुखकर्ता.
सुर्याजीराव पश्चिमेला जसे कलंडू लागले..
तसा आसमंत अधिक हवाहवासा वाटू लागला.
सावल्या रूंदावल्या.
तांबडा सुर्यगोल नारंगी.. केशरी होऊ लागला.
डावीकडे उत्तरेश्वरची डोंगररांग सोबत होतीचं.
झाडणी कधीचं मागे पडली.तिथलं थंडगार ताक
पिलो.फार बरं वाटलं राव.चकदेवहून शिडीघाट उतरताना आंबिवली अलीकडे एका धनगराच्या अंगणात हांडाभर ताक संपवल्याची घटना तरळून गेली.इथे गुरंढोरं हिचं श्रीमंती.एकपिक शेती बरोबर उत्पन्नाचं अजून एक साधन.
दूध,तुप,खवा,ताक यातलं काही तरी मिळणार.नक्की.
पुढे दूरवर कांदाटवस्ती नजरेच्या टप्प्यात आली.
म्हणजे.. दिवस-उजेडात आपण तिथे पोहचणार.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
☘️
तिन्हीसांजेचा बोलवा आला.
थकलं शरीर आणि कुतुहली मनं
गहिवरलं.
परतीचा हा सुखसोहळा केवढा श्रीमंत..
आणि..
आम्ही तो उपभोगणारे आम्ही
अधिक गडगंज.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
केशरी गोल अस्ताला गेला..
गोरजसमयीचे पाश अधिक गडद होऊ लागले.
समोर पर्वत्या आडवा बहारदार..
उजवीकडे तेलसरीची वाट अंधुकशी होऊ लागलेली.
नाळेचा पदर आत कुठेशी लपलेला.
🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
आणि..
दिवाबत्तीच्या समयी आम्ही सर्व भिडू
कांदाटच्या अंगणात पोहचलो होतो.
एका सुखवस्तू घराजवळ थांबलो.
चहापाणी घेतलं.
तेथून हाकेच्या अंतरावर आमचं मुक्काम होतं.
तरी..
इथे थांबावस वाटलं.
☘️
एकदाचे पोहचलो मुक्कामी.
जिथे मुक्काम.. ती जागा..घर तर स्वप्नवत.
ऐसपैस..
" होल वावर इज आवर ...!!! असं मस्त.
शेतक-याची शानदार हवेली.
आपलंस करणारी वास्तू.
हळवं करणारीही.
🚩
सँक उतरवल्या..
ओझं हलकंस झालं.
चहापाणी होईपर्यत.. स्थिरावलो.
मग..
मुबलक पाण्या न्ह्याईलो.
सर्व एकदम ताजेतवाने झाले.
अंगणात गप्पांचा फड रंगला.
तिकडे चूल धगधगू लागली.
24 लोकांचा स्वयंपाक म्हणजे त्यांच्यादृष्टीने
गांवजेवणचं जणू.
होऊ द्या निवांत..अश्या स्थितीत सर्व.
☘️
ऐसपैस ओसरीत...ग्रुपने पंगत बसली.
चवदार जेवणावर ताव मारला.
तांदळाची भाकर..वाटाणा-बटाटा भाजी
नी दाळभात 👌
सर्व सुखासुखी जेवले..पोटभर
मग थोड्या गप्पा.. चेहेलपेहेल.
आणि..
हळूहळू अंथरूण पसरू लागली.
☘️
काल रात्रीचा सलग प्रवास..
आज दिवसभर चाल.
त्यामुळे नाही म्हटलं तरी विश्रांतीची
गरज होतीचं.
जास्त खडखड न करता सर्व
मिळेल तिथे पसरले..
बाहेर रात्र थबकल्या सारखी झाली होती.
एखाद्या मादक पेयासारखा तीचा अंमल मात्र
चढणीला लागला होता.
नी इकडे..
दिवस सार्थकी लागल्याचे भाव
अंथरुणात निद्रीस्त होऊ लागले होते.
बंद डोळ्यात आणि मनात सुखाचं चांदणं नांदत होतं.
निद्रेने पाश आवळले होते.
(पहिला भाग समाप्त 🙏)
■ दूसरा भाग.कांदट ते कांदोशी व्हाया
नाळेची वाट.
धन्यवाद
संजय अमृतकर
Gypsy trekkerS
nashik 🚩
★★★★★★★★★★★★★★★★★★★
तो शेवटचा पॅरा वाचताना अक्षरशः पाणी आले डोळ्यात.....
ReplyDeleteप्रत्यक्ष तिथे जाऊन नाही पण तुमच्या लिखाणातून तो अनुभव घेता आला आणी ते इतकं भिडलं हृदयाला की समाधानाने आनंदाश्रू आले.
निव्वळ स्वर्गीय अनुभुती.
नाना परत एकदा कंदोशी ते कांदाट असं फिरून आल्यासारखं वाटलं, ट्रेक करताना जे काही सौंदर्य अनुभवता आलं नाही ते आपल्या लिखाणातून परत मिळालं व सुखावुन गेलो, खुप सुंदर लिखाण
ReplyDeleteकेवळ आपल्यामुळे हा अविसमरणीय ट्रेक करता आला, पुढील भाग कधी येईल याची आस लागली आहे
नाना सुपर लिखाण, जबरदस्त लिखाण, वाचून पुन्हा तिथेच असल्याचा भास होत होता, नाना तुमच्या मुळेच असे हटके ट्रेक करायला मिळतात नाशिक करांना,
ReplyDeleteअप्रतिम लेख. नाना तुमची लिखाणाची जादू मनावर गारूड घालते.
ReplyDeleteआठवणीत राहील असा ट्रेक तुमच्या सोबत करता आला . ब्लॉग वाचून परत उजळणी झाली.
ReplyDeleteखूप यथार्थ वर्णन .